स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळणे अवघड!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा देण्यास केंद्रीय वस्त्रोद्योग खात्याने अद्याप अनुमती दिलेली नाही. या जमिनीच्या मोबदल्याचा आर्थिक भार कोणी उचलायचा या मुद्दय़ावर निर्णयाचे गाडे अडले आहे. परिणामी महापरिनिर्वाण दिनापूर्वी ही जागा स्मारकाला मिळणे कठीण असल्याचे चित्र आहे.
स्मारकासाठी इंदू मिलची साडे बारा एकर जमीन मिळावी, अशी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांची मागणी आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यासाठी केंद्राला विनंती केली आहे. त्यावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस त्याचा विचार करून जमीन देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे वस्त्रोद्योग मंत्रालयाला सांगितले होते.
स्मारकासाठी ५ डिसेंबरपर्यंत जमीन मिळाली नाही तर दुसर्या दिवशी महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन कार्यकर्ते मिलमध्ये घुसून ताबा घेतील, असा इशारा आठवले यांनी दिला आहे. प्रसंगी बलिदान देण्याची ५00 तरुणांची तयारी असल्याचे आठवले यांनी आज ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तोवर या प्रश्नाकडे देशाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या, गुरुवारी दुपारी १ वाजता संसदेवर मोर्चा नेणार असून त्यात ५0 हजार कार्यकर्ते सहभागी होतील असे आठवले यांनी आज सांगितले. मोर्चानंतर पक्षाचे शिष्टमंडळ पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, कृषी मंत्री शरद पवार, गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांना निवेदन देणार आहे.

............trying
ReplyDelete